BARAMATI BREAKING : बारामतीत पोलिसच असुरक्षित; अज्ञात वाहनचालकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली कार..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती एमआयडीसीत कारचे स्टंट करणाऱ्या वाहनचालकाने चक्क बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावरच कार घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जखमी पोलिस कर्मचारी संतोष दत्तू कांबळे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, दि. २९ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कांबळे यांना त्यांचे सहकारी पोलिस शिपाई तरंगे यांनी फोन करून ऐश्वर्या बेकरीजवळ एक नंबर नसलेल्या व्हेरना कारचा चालक स्टंट करत असल्याची आणि त्यातून नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यावर कांबळे हे शासकीय वाहन घेऊन त्या ठिकाणी गेले असता एक काळ्या रंगाची व्हेरना कार आडवी लावल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्या ठिकाणी पोलिस शिपाई तरंगे आणि पोलिस हवालदार गरुड हेही उपस्थित होते.

ही कार लॉक असल्यानं आजूबाजूला चौकशी केल्यानंतर एक तरुण त्या ठिकाणी आला. त्याला नाव विचारल्यानंतर त्यानं नाव सांगण्यास नकार दिला. या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला तू अशा पद्धतीने स्टंट करून लोकांना त्रास देऊ नकोस असं सांगितलं. त्यावर या तरुणानं तुम्ही मला ओळखत नाही म्हणत अरेरावीची भाषा केली. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी तुझ्या कारला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करू असं सांगून क्रेन बोलावून घेतला. क्रेन आल्यानंतर या तरुणाने या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

माझ्या नादाला लागला तर एकेकाला गाडीखाली घेऊन जीवे मारेन असं धमकावत त्यानं कार सुरू करून रिव्हर्स घेत पोलिस कर्मचारी संतोष कांबळे यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे कांबळे हे पाठीमागील बाजूस डोक्यावर पडले. त्यावर अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत कारसह पळ काढला. या घटनेनंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी जखमी झालेल्या संतोष कांबळे यांना तात्काळ बारामती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

संतोष कांबळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते काही काळ बेशुद्ध पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संतोष कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), १२१(२), १३२, ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक डी. बी. भगत या अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पोलिसांकडून निष्पन्न झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसच असुरक्षित असल्याचं या निमित्तानं समोर आलं आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!