पुणे : न्यूज कट्टा
पैशांसाठी मैत्रिणीकडून सातत्याने होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने पुण्यात एका तरुणाने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खासगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणाऱ्या या तरुणीवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा. संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कार्तिकचा भाऊ तंगराज शेट्टीयार याने दिलेल्या फिर्यादीवरुन साक्षी बाळू वाघचौरे (वय २३, रा. अचानक चौक, वारजे) हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येची घटना ३० एप्रिल रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार्तिक हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. गेल्या वर्षी त्याची साक्षीसोबत ओळख झाली. पुढे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांच्यात सातत्याने फोनवरुन संवाद सुरू होता. त्यातूनच ते दोघेही मैत्रीच्या पुढे गेले होते. त्यांच्यातील संबंध दृढ झाल्यानंतर साक्षीने कार्तिककडून घरासाठी म्हणून जवळपास २७ लाखांपेक्षा अधिक रक्कम घेतली होती. कार्तिकने आपल्या मित्रांकडून पैसे घेऊन साक्षीला दिलेले होते.
कार्तिक आणि साक्षीचा संवाद सतत सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर भाऊ तंगराज याने विचारणा केली होती. त्यावर कार्तिकने ती मैत्रीण असल्याचं जुजबी उत्तर दिलं होतं. दरम्यानच्या काळात, साक्षीकडून सातत्याने पैशांची मागणी वाढू लागली. पैसे न दिल्यास खासगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही तिने दिली होती. याबाबत कार्तिकच्या भावाने विचारणा केल्यानंतर साक्षी आपल्याला पैशांसाठी आणि भेटण्यासाठी सतत त्रास देत असून तिच्या त्रासामुळे मी कंटाळलो असून जीवाचे बरेवाईट करावेसे वाटत असल्याचं कार्तिकने सांगितलं होतं.
३० एप्रिल रोजी साक्षी आणि कार्तिक दोघेही नवले पूलाजवळ असलेल्या इंडिया गेट लॉजमध्ये एकत्र थांबले होते. या दरम्यान, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी साक्षी बाथरूममध्ये गेली असताना कार्तिकने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कार्तिकच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर साक्षीवर ब्लॅकमेलिंग करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.





