बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो असं सांगतानाच लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिम्मत ठेवणाऱ्यांच्या हातातच कारखान्याची सत्ता द्यायची असाच निर्धार मालेगावच्या सभासदांनी करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जोपर्यंत माझे हातपाय चालतात, तोपर्यंत तुमचं भलंच करणार असंही सांगायला ते विसरले नाहीत. माळेगाव कारखान्याचा चेअरमन आपणच होणार असल्याची घोषणा करत पुढील पाच वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही निर्धार केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अजितदादांच्या हस्ते पाहुणेवाडी येथून करण्यात आला. यावेळी केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, रविंद माने, संजय कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेकजण म्हणतात मी सहकार संपवला. मला सहकार संपवायचा असता तर बारामतीतील सहकारी संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असता का असा सवालही अजितदादांनी उपस्थित केला.
बारामतीचा आमदार म्हणून मी राज्यात फिरत असतो. माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर कारखान्याचं कोणतं काम अडेल का..? मीच माझ्यासोबत ४० आमदार निवडून आणले आहेत. त्यातल्याच एकाला सहकार मंत्री बनवला आहे. त्यामुळं आपली कामे कुठेही खोळंबणार नाहीत. त्याचवेळी मी स्वत: चेअरमन असल्यानंतर कारखान्यालाही शिस्त आल्याशिवाय राहणार नाही असेही अजितदादांनी यावेळी नमूद केले.
https://www.facebook.com/share/v/16ZMdfJeaL/ अजितदादांचे संपूर्ण भाषण
काहीजण म्हणतात राज्यात उपमुख्यमंत्री असलेले संचालक होतायत. मी संचालक झालो म्हणून बिघडलं कुठं..? मलाही संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळं जोपर्यंत माझे हातपाय चालतात, तोपर्यंत तुमचं भलंच होईल. ज्या दिवशी मला वाटेल बारामतीकरांना माझ्यापेक्षा चांगला माणूस मिळाला तेव्हा मी स्वत:हून बाजूला होईल असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी बोलताना त्यांनी गावोगावाच्या गटातटाच्या राजकारणावर भाष्य केलं. मी सगळ्यांना विविध संस्थांमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आता कारखान्यात संधी मिळाली नाही म्हणून नाराज न होता तुम्हाला इतर ठिकाणी संधी मिळेल याबाबत शाश्वत राहण्याच्या सूचना केल्या. तसेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कुठेही गडबड होऊ न देता पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड मताधिक्याने नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं.





