बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा स्वत:कडेच घेण्याची घोषणा करतानाच येणाऱ्या पाच वर्षात माळेगाव कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये गणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. अजितदादांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे कार्यक्षेत्रातील वातावरण फिरलं असून पुढील पाच वर्षात कारखान्याच्या कारभारात प्रचंड शिस्त येणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
आज निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करताना अजितदादांनी कारखान्याचं अध्यक्ष आपण स्वत: होणार असल्याचं जाहीर केलं. अनेक वर्षांपासून छत्रपती कारखान्याचं अध्यक्ष व्हावं अशी इच्छा होती. परंतु तिथं जमलं नाही. आता माळेगाव कारखान्यात मीच अध्यक्ष झालो तर कारभार कसा सुरळीत होत नाही हेच पाहतो असं सांगत त्यांनी तुम्ही सगळेच अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षात ज्या सूचना कराल त्यावर आपण निश्चितच धोरणात्मक निर्णय घेऊन सभासदांचे हित साधण्यावर भर देऊ अशी ग्वाही अजितदादांनी दिली.
माळेगाव कारखान्याचा राज्यात वेगळा नावलौकीक आहे. अजितदादांनी स्वत:च अध्यक्षपद घेण्याचं जाहीर केल्यामुळं कारखान्याच्या निवडणुकीतील रंगत अधिक वाढली आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे कार्यक्षेत्रातील वातावरण फिरल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. अजितदादा हे शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कारखान्याचा कारभार हातात घेतल्यास सभासदांना उच्चांकी दराबरोबरच ऊस गाळप, ऊस पेमेंट यासारखे प्रश्न तात्काळ मार्गी लागणार आहेत.
कारखान्याच्या कारभाराला शिस्त लागण्याच्या अनुषंगाने अजितदादांनी घेतलेला निर्णय या निवडणुकीत फायदेशीर ठरेल अशी भावना सभासद व्यक्त करत आहेत. अजितदादांच्या नेतृत्वात माळेगाव कारखान्याच्या प्रगतीला अधिकची गती मिळेल, त्याचवेळी सभासदांचेही हित साधले जाईल असाही विश्वास या निमित्तानं व्यक्त केला जात आहे. एकूणच आज अजितदादांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देतानाच कारखान्याच्या अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर करून वातावरण फिरवलं अशीच चर्चा आता होत आहे.





