मावळ : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून काही पर्यटक बुडाल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलिसांसह मदत पथकही पोहोचले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मावळ तालुक्यातील कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. आज रविवार असल्यामुळे कुंडमळा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. या दरम्यान, कुंडमळा ओलंडण्यासाठी असलेला इंद्रायणी नदीवरील पूल आज दुपारी अचानकपणे कोसळला.
एकाचवेळी अनेक वाहने गेल्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यावेळी या पूलावर मोठ्या संख्येने पर्यटक हजर होते. पूल कोसळल्यानंतर २० ते २५ पर्यटक इंद्रायणी नदीत पडून वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या घटनेत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.





