बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचेही आयोजन करण्यात आले आहे. आज मळद येथे झालेल्या सभेत अजितदादांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत स्पष्ट भाष्य केलं. मूळात माळेगावची निवडणूकच आपण अध्यक्ष होण्यासाठी लढवत असून माझ्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ बैठक झाल्यानंतर कारखान्याच्या कारभारात वेडंवाकडं काही होण्याचा विषयच येत नाही. उलट मी असताना कारखान्याच्या प्रगतीला अधिकचा हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलं. तसेच मी जीवंत असेपर्यंत माळेगाव कारखाना सहकारीच राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ मळद येथे आयोजित सभेत अजितदादा बोलत होते. यावेळी त्यांनी आपण निवडणूक का लढवत आहोत याबद्दल स्पष्टीकरण दिलं. माळेगाव कारखान्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला होता. संचालक मंडळात समाविष्ट असल्यानंतर अध्यक्ष व अन्य लोकांनी काही निर्णय घेतला, तर संबंधित संस्थेच्या सर्वच संचालकांना नोटीसा आणि अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. राज्य सहकारी बँकेत मला याचा अनुभव आला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पुढे अजितदादा म्हणाले, मी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवतोय ते अध्यक्ष होण्यासाठीच.. मीच अध्यक्ष असेल तर माझं संचालक मंडळ माझ्या परस्पर कोणताही चुकीचा निर्णय घेऊच शकणार नाही. त्यामुळं कारखान्यात काही वेडंवाकडं होण्याचा विषयच येत नाही. उलट मी असल्यानंतर कारखान्याच्या प्रगतीत अधिकचा हातभार लावून पुढची पाच वर्षे उजवी कामगिरी करून दाखवेल. मागील संचालक मंडळाने सातत्याने उच्चांकी दर दिला. आजही माळेगावइतका अॅडव्हान्स कोणत्याच कारखान्याने दिला नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचाही अजितदादांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. हे उठतात आणि सभासदांना काहीही सांगतात. मी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारीच असेल असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. आता कारखान्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. माझी प्रशासनावर पकड आहे, त्यामुळं मी एखादा विषय आल्यानंतर त्यावर निर्णय घेऊनच थांबतो. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्षपद घेतल्यानंतर तुम्ही काही मुद्दा आणला आणि तो सभासदांच्या हिताचा असेल तर मी त्यावर निर्णय घेण्यासाठी कुठेही मागेपुढे पाहणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मी चुकीचा शब्द वापरला असेल तर राजकारण सोडीन..!
काल-परवा मी बारामतीतील सहकारी संस्थांना पेट्रोलपंप सुरू करून दिल्याचं सांगत होतो. त्यावेळी उद्योगपती धिरूभाई अंबानी हे पेट्रोल सोडूनच कोट्यधीश झाल्याचं उदाहरण दिलं. त्यानंतर चॅनलवाल्यांनी उलटंच दाखवायला सुरुवात केली. काहीही वेडंवाकडं दाखवून लोकांमध्ये गैरसमज पासरवला जातो. वास्तविक आम्ही जबाबदार लोक आहोत. काय बोललं पाहिजे, काय नाही बोलावं, कशा पद्धतीनं बोलावं हे कळतं. मागे चूक झाल्यानंतर त्याची जबरदस्त शिक्षा मी भोगली आहे. असं असताना ध चा मा करण्याचा प्रयत्न ज्या मिडियाने केला, त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो असं त्यांनी नमूद केलं. याबाबत मी जर चुकीचा शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून देईन असंही सांगायला ते विसरले नाहीत.





