MALEGAON ELECTION : निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता; अजितदादा म्हणाले, रात्र वैऱ्याची आहे.. कार्यकर्त्यांनो गाफील राहू नका..!

माळेगाव : न्यूज कट्टा    

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. प्रचार संपला म्हणजे काम संपलं नाही. कारण आता रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे इथून पुढे गाफील राहू नका अशा सुचनाच त्यांनी दिल्या.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता सभा आज माळेगाव येथे पार पडली. या सभेला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माळेगाव कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या सभेला झालेली गर्दी पाहिल्यानंतर ही विजयी सभाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु प्रचार संपला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. इथून पुढे रात्र वैऱ्याची असणार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी जराही गाफील राहता कामा नये असे ना. अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. आतापर्यंतचं मी सर्वांच्या सहकार्यानं केलेलं काम पाहिल्यानंतर कोणालाही आमचा पराभव करणं शक्य नाही. मात्र आमचीच लोकं आमचा पराभव करतात असा माझा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक काळात अनेकांना विविध पदांवर जाण्याची संधी असते. मात्र प्रत्येकाला संधी मिळेलच असं नाही. अशा परिस्थितीत काहीजण चुकीचं काम करतात आणि त्यातून पराभव स्वीकारावा लागतो. वास्तविक आम्ही ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा इतर संस्थांमध्येही विचार करत असतो. त्यामुळं नाउमेद न होता चांगल्या पद्धतीने काम करा आणि सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यासाठी पुढील दोन दिवस कष्ट घ्या अशा सूचना अजितदादांनी यावेळी केल्या.

मी कधीही फुशारकी मारत नाही, जनतेच्या हितांच्या कामाला महत्व देत असतो. त्यामुळं माळेगाव कारखान्याच्या भवितव्याचा विचार करून सगळ्यांनी मतदान करा. बारामती तालुक्यातील सहकारी संस्था मी कशा पद्धतीने चालवतो हे सगळं तुमच्यासमोर आहे. सहकारात राजकारण आणू नये हा ठाम मताचा मी आहे. त्यामुळे आता निर्णय तुमच्या हातात आहे. या निवडणुकीत तुम्ही कारखान्याच्या प्रगतीसाठी निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहनही त्यांनी केलं.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!