सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याबद्दल वाच्यता केल्यास तुझ्यासह कुटुंबाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दोघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा ऊर्फ ऋतिक वायकर (रा. करंजेपुल, ता. बारामती) आणि बाळा ऊर्फ दयानंद होळकर (रा. होळ, ता. बारामती) या दोघांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी ऋतिक वायकर याने तिला फोन करून, तुला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं आहे असं सांगून निरा डाव्या कालव्याच्या लोखंडी पुलाजवळ बोलावून घेतलं. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तिला जवळच असलेल्या शेतातील विहीरीनजीक बांधलेल्या खोलीत नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत जर कोणाला सांगितलं तर कुणालाही जीवंत ठेवणार नाही अशी धमकी त्याने दिली.
त्यानंतर दयानंद होळकर यानेही पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्या घरी जबरदस्तीने प्रवेश करून, तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. त्यानेही तिला आणि तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर ऋतिक वायकर याने त्यानंतर पीडित मुलीला आपल्या मित्राच्या घरी नेले. तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत, घराच्या दरवाज्याला आतून कडी लावून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. जर हा प्रकार पोलिसांना सांगितलास, तर मी जेलमधून सुटल्यानंतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन, लग्न होऊ देणार नाही आणि तुझ्या घरातील कुणालाही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली.
या प्रकरणी संबंधित पीडितेने फिर्याद दिल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी ऋतिक वायकर आणि दयानंद होळकर या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६४ (२), ६५ (१), ७५, ३५१ (२), ३५१ (३), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,६,८,१२ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), ३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.





