MALEGAON BREAKING : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची शनिवारी निवड; अध्यक्षपद अजितदादांकडेच, उपाध्यक्षपदी संधी कुणाला मिळणार..?

बारामती : न्यूज कट्टा      

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्षांची निवड शनिवार दि. ५ जुलै रोजी होणार आहे. या कारखान्याचे अध्यक्षपद आपण स्वत:कडेच ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं आता अजितदादाच कारखान्याचे अध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: सहभाग घेत ‘ब’ वर्गातून उमेदवारी जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणे त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे २१ पैकी २० जागांवर अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार निवडून आले.

निळकंठेश्वर पॅनलच्या एकतर्फी विजयानंतर अजितदादांनी माळेगावमध्ये मेळावा घेत सभासदांचे आभार मानत पुढील पाच वर्षात कारखान्याचा कायापालट करून दाखवणार असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी त्यांनी पुढील पाच वर्षांचा कारभार कसा असेल यावर थेट भाष्य केलं. काटकसर आणि धोरणात्मक निर्णय यावर भर देत सभासदांना सर्वाधिक दर देण्यावर आपला भर असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शनिवार दि. ५ जुलै रोजी माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता कारखान्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही निवड पार पडणार आहे. अध्यक्षपद स्वत: अजितदादा घेणार आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजितदादांच्या कार्यपद्धतीला साजेशा, सभासदांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि सहज उपलब्ध राहू शकणाऱ्या संचालकाला उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. कारखान्याचे अध्यक्षपद अजितदादांकडे राहणार असल्यामुळे उपाध्यक्षपद तितक्याच जबाबदार व्यक्तीकडे देऊन कारखान्याचे कामकाज चालवले जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!