बारामती : न्यूज कट्टा
बारामती-पाटस पालखी महामार्गावरील शिर्सुफळ फाट्याजवळ गुरुवारी रात्री उशीरा एक भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौंडकडून येणाऱ्या भरधाव वेगातील कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीस्वाराचं शीर धडापासून वेगळं झालं आहे. या प्रकरणी सुपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमित लक्ष्मण लगड (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) आणि विशाल रामचंद्र कोकरे (वय ३४, रा. धुमाळवाडी, पणदरे, ता. बारामती) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अजित लगड हा टाटा टिगोर (क्र. MH 42 BE 5866) या कारने दौंडकडून बारामतीच्या दिशेने जात होता. शिर्सुफळ फाट्याजवळ अजित लगड याचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं दुभाजक तोडून ही कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आली.
त्यावेळी पाटसच्या दिशेने जात असलेल्या विशाल कोकरे याच्या युनिकॉर्न ( क्र. MH 42 BA 6875) दुचाकीला जोरदार धडक बसली. यात कारचालक आणि दुचाकीस्वार या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, विशाल कोकरे या दुचाकीस्वाराचं शीर अक्षरश: धडापासून वेगळं होऊन बाजूला पडलं होतं. तर कारमध्ये अडकलेली दुचाकी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावी लागली.
या घटनेनंतर हर्षद रामचंद्र कोकरे यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत कारचालक अजित लगड याच्यावर बीएनएस कलम 281, 125 (अ), 125 (ब), 106 (1), 324 (2) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी हे करत आहेत.





