अक्कलकोट : न्यूज कट्टा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाई फेकल्याचा प्रकार घडला आहे. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी ते अक्कलकोट येथे आले होते. कार्यक्रमस्थळाकडे जात असतानाच त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर वातावरण तापलं असून पोलिसांनी शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आयोजकांसह प्रवीण गायकवाड हे कार्यक्रम स्थळाकडे जात असताना अचानकपणे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला आणि वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांना वाहनात बसवून नेले जात असताना त्यांना धक्काबुक्की झाल्याची माहितीही समोर येत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांचा कथित एकेरी उल्लेख केल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवधर्म फाउंडेशन आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी ही शाईफ़ेक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.





