मुंबई : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक संचालक संजय देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गेल्या पंधरा वर्षांपासून ते अजितदादांकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करत विश्वासू आणि अनुभवी सहकारी गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय देशमुख हे सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील रहिवासी होते. ते गेल्या पंधरा वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या संयमित आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मुंबई दिनांक आणि दैनिक सकाळ या माध्यम समूहातून केली होती. माध्यमांतील अनुभवामुळेच त्यांच्या शासकीय जनसंपर्क कार्यात व्यावसायिकता आणि सुसूत्रता होती.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. सोमवार दि १४ रोजी सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
अजितदादांकडून श्रद्धांजली
संजय देशमुख यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला. ‘मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं. त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





