गंगाखेड : न्यूज कट्टा
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भल्या सकाळी मुख्याध्यापकाने शाळेच्या खोलीतच मद्यपानाचा कार्यक्रम केल्याचं समोर आलं आहे. या मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करत त्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला असून मुख्याध्यापकाच्या उद्योगाची खमंग चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मनमानीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी समोर आल्या आहेत. शाळेतील लोखंडी दरवाजे, बाक अशा विविध वस्तूंची विक्री हे मुख्याध्यापक महाशय करत असल्याची माहिती पालकांना मिळाली होती. त्यामुळं शनिवारी पालकांनी अचानक शाळेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी हे महाशय शाळेच्या खोलीत बसून चक्क मद्यपान करताना आढळून आले.
पालकांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी थातूरमातूर उत्तरं देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पालकांनी शाळा बंद करण्याचा इशारा देत या मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोकलेवाडी शाळेला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.
https://www.facebook.com/NewsKattaLive/videos/-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%9A-90-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/703655282493130/?rdid=9AyEv6h5VEgcurSL
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संबंधित मुख्याध्यापकाचे नाव बिराजदार असे असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर शिक्षण विभागाकडून अद्याप कारवाई झाली नसल्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दुसरीकडे मास्तरच शाळेत दारू पिताना सापडल्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे कान धरणाऱ्या मास्तरवर स्वत:चेच कान धरायची वेळ आल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे.





