चाकण : न्यूज कट्टा
कामावर जायला उशीर होत असल्यानं लिफ्ट मागून दुचाकीवरून निघालेल्या युवकाचा कंटेनरखाली येवून मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७ वर्ष, रा. येलवाडी ,ता. खेड ,जि. पुणे) असे अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. यात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कंटेनरचालक मोहम्मद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, गजानन बोलकेकर हा चाकण औद्योगिक वसाहतीतील पानसे ऑटोकॉम कार्पोरेशन प्रा. लि. या कंपनीत एचआर विभागात काम करत होता.
सकाळी कंपनीत जायला उशीर होत असल्यामुळे त्याने रस्त्यावर थांबून एका दुचाकीचालकाला लिफ्ट मागितली. ते चाकणकडे जात असताना खड्डा चुकवताना निसरड्या रस्त्यावरून दुचाकी घसरली आणि शेजारून जात असलेल्या कंटेनरखाली आली. यात कंटेनरचे चाक अंगावरून गेल्यामुळे गजानन बोलकेकर याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गजानन याचे एप्रिल महिन्यात लग्न झाले होते. मूळच्या बोळका, जि. नांदेड येथील रहिवाशी असलेला गजानन गेल्या दीड वर्षांपासून चाकणमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.





