बारामती : न्यूज कट्टा
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, पुणे जिल्हा परिषद व बारामती पंचायत समितीच्या माध्यमातून आणि पिंपळी येथील उदय प्रभाग संघ व एकता महिला ग्रामसंघाच्या सहकार्यातून पिंपळी लिमटेक येथील दहा बचत गटांना प्रत्येकी साठ हजारांप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांच्या समुदाय संसाधन निधीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
पिंपळी येथील ग्रामपंचायत सभागृहात प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी, सरपंच स्वाती ढवाण, समुदाय संसाधन अश्विनी बनसोडे,ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी यांनी समूदाय संसाधन निधीचा उपयोग वैयक्तिक अथवा सामूहिक व्यवसाय स्थापन करण्यासाठी करावा अन्य ठिकाणी खर्च करू नये असे सांगत स्वतःचा व्यवसाय स्थापन करून स्वतःचा आर्थिक विकास साधावा व कर्जाची नियमित परतफेड करावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी खेळते भांडवल, आर.एफ, ऑडिट रजिस्टर पूर्ण करणे, आरोग्य विषयक माहिती, बँक कर्ज प्रकरण, महिलांसाठी विविध ट्रेनिंग, मार्केटींग आदींविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या व्यवसाय उद्योगासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजना आणि शासनाच्या विविध उद्योग,व्यवसाय योजनांबद्दल माहिती दिली. समुदाय संसाधन निधीचा चांगला वापर करून आपली प्रगती साधावी आणि उर्वरित गटांनी देखील समुदाय संसाधन निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अश्विनी भोसले, स्वाती माने, माधुरी धोत्रे, भारती यादव, शितल निंबाळकर, राणी यादव, मुमताज इनामदार, छाया शिंदे, शीला वाघ, अरुणा वाघ, स्वाती ठेंगल, कविता यादव, उषादेवी ठेंगल, माधुरी यादव, रेशमा रुपनवर, मनिषा मारकड, उषा घोरपडे, पूनम थोरात, शुभांगी माने, मानीनी थोरात, बेबी खोमणे आदी बचतगटातील प्रमुख महिला उपस्थित होत्या.





