बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील बँक ऑफ बडौदाच्या शाखा व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. कामाचा अतिरिक्त भार आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार टाकू नका अशी विनवणीही या व्यवस्थापकांनी चिठ्ठीद्वारे केली असून आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामती परिसरात, विशेषतः बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शिवशंकर मित्रा (वय ४५) असं आत्महत्या केलेल्या शाखा व्यवस्थापकांचं नाव आहे. त्यांनी काल गुरुवारी मध्यरात्री बँकेत गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहित आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं आहे. बँकेच्या कामाचा अतिरिक्त भार आणि दबावामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत नमूद केलं आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. ते १०० टक्के आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण देऊ नका अशी विनंती त्यांनी या चिठ्ठीद्वारे केली आहे.आत्महत्येचा निर्णय मी पूर्ण शुद्धीत आणि स्वत:च्या इच्छेनुसार घेतला आहे. यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. बँकेच्या कामाच्या हाय प्रेशरमुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे.
माझी पत्नी प्रिया आणि मुलगी माही या दोघींनी मला माफ करावं आणि शक्य झाल्यास माझ्या मृत्युनंतर माझे डोळे दान करावेत असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कामाचा व्यापामुळे तणावात होते. त्यातूनच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. कामाचा असह्य ताण, वरिष्ठांचा दबाव यामुळे त्यांनी काल बँकेतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर बारामती आणि परिसरात खळबळ उडाली आहे.





