HAPPY STREET : बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने आज आणि उद्या ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ उपक्रमाचं आयोजन

बारामती : न्यूज कट्टा

नागरिकांनी मोकळ्या हवेत, मोबाईलपासून दूर राहत खेळ, संगीत, कला आणि पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवावा, या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवस ‘हॅपी स्ट्रीटस बारामती’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार दि. २६ जुलै रोजी संध्याकाळी चार ते रात्री दहा आणि रविवारी दि. २७ जुलै रोजी सकाळी सहा ते दहा या वेळेत विद्या कॉर्नरनजिक जळोची कॉर्नर ते गदिमा पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा हॅपी स्ट्रीट उपक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली. दोन्ही दिवसांचा हा उपक्रम नागरिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर अँड सफारी, गेम्स, हेल्थ अँड फिटनेस आणि पर्यावरण असे विविध झोन तयार करण्यात येणार आहेत. आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटिंग, पोर्ट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग यांचा समावेश आहे. सफारी झोनमध्ये नक्षत्र उद्यान परिसरात घोडेस्वारी, उंट सफारी, बैलगाडीतून फेरफटका मारता येईल. हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये योगा, मल्लखांब व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर होतील.

गेम झोनमध्ये पारंपरिक व आधुनिक खेळांचा संगम असलेले विविध खेळ मोफत खेळता येणार आहेत. यात सापशिडी, लगोरी, लुडो, गोट्या, कॅरम, बुध्दीबळ, बलून शूट, बास्केटबॉल, आर्चरी यांचा समावेश आहे. पर्यावरण विभागात, बारामती नगरपरिषदेच्या सहकार्याने नागरिकांना स्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, ई-कचरा व्यवस्थापन व होम कंपोस्टिंग याबाबत माहिती दिली जाणार आहे. म्युझिक झोनमध्ये गिटार, अँकार्डियन, माउथ ऑर्गन यांसारख्या वाद्यांवर लोकप्रिय गीते वादक सादर करतील.

दोन्ही दिवस खवैय्यांसाठी महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील. या शिवाय मुलांच्या मनोरंजनासाठी कार्टून पात्रे, जादूगार व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्यपदार्थ वगळता इतर सर्व उपक्रम मोफत असून, बारामतीकरांनी या दोन दिवसांत आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून हॅपी स्ट्रीटसचा आनंद घेण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!