बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात आज सकाळी हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता बारामती शहर पोलिसांनी हायवा ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दशरथ दत्तात्रय डोळे (वय ५०, रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असं या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३७, रा. खंडोबानगर, बारामती) हे आपल्या मुली सई ओंकार आचार्य (वय १०) आणि मधुरा ओंकार आचार्य (वय ४) या दोघींना घेऊन दुचाकीवरून (क्र.एमएच ४२ बीके ४८४४) घरी जात होते. महात्मा फुले चौकातून खंडोबानगरकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या टाटा कंपनीच्या हायवा ट्रकने (क्र. एमएच १६ सीए ०२१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यामध्ये ओंकार आचार्य, सई आचार्य आणि मधुरा आचार्य हे ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. त्यामध्ये ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सई आणि मधुरा यांना दवाखान्यात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर मयत ओंकार यांचे बंधू अमोल आचार्य यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित हायवा चालक दशरथ डोळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल सातपुते हे करत आहेत.





