बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आचार्य कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच या धक्क्याने राजेंद्र आचार्य यांचंही आज पहाटे निधन झाले. कालच्या प्रचंड मोठ्या आघाताला २४ तासही उलटले नाही, तोच आचार्य कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काल रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने चिरडल्याने ओंकार राजेंद्र आचार्य, सई ओंकार आचार्य (वय १० वर्षे) आणि मधुरा ओंकार आचार्य (वय ४ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एकाचवेळी वडील आणि दोन मुलींच्या अपघाती मृत्यूमुळे बारामती सुन्न झाली होती. या घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असतानाच आज सकाळी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली.
मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचं आज पहाटे निधन झालं. निवृत्त शिक्षक असलेले राजेंद्र आचार्य हे गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.
काल झालेल्या अपघाताच्या घटनेला २४ तासही उलटले नाही तोच आचार्य कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे. एकाच दिवसात या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राजेंद्र आचार्य यांनी अनेक वर्षे इंदापूर तालुक्यातील सणसर परिसरात शिक्षक म्हणून सेवा केली. त्यामुळे या परिसरात ते सुपरिचित होते. मात्र नियतीने एकापाठोपाठ एक आघात केल्यामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.





