बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात झालेल्या अपघातात वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर बारामतीतील सुजाण नागरीकांनी पुढाकार घेत वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचवत विविध मागण्या केल्या आहेत. आज बारामती येथील प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओंकार राजेंद्र आचार्य हे आपल्या दोन मुलींसह दुचाकीवरून जात असताना त्यांना भरधाव वेगातील हायवा ट्रकने धडक दिली. त्यामध्ये या ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून ओंकार यांच्यासह त्यांच्या मुली सई आणि मधुरा यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेचा धक्का बसल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचेही या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच निधन झाले. २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीकर हेलावून गेले.
याचदरम्यान, काल महात्मा फुले चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. या घटनेनंतर बारामतीतील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यावर उहापोह केला. शहराचा विकास होत असताना अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासह विविध उपाययोजना करण्याची गरज या निमित्तानं व्यक्त करण्यात आली. त्यानुसार विविध मागण्या आणि उपाययोजनांबाबत निवेदन तयार करून आज निवेदन आज बारामती येथील प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना देण्यात आले.
शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी, गतीरोधकांवरील पांढरे पट्टे, वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, अल्पवयीन चालकांवर कारवाई, नो पार्किंग झोन निर्मिती, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई अशा अनेक उपाययोजना या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून याबाबत त्वरीत कार्यवाही करून अपघातमुक्त बारामतीसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.





