BARAMATI CRIME : बारामतीत चालत्या बसमध्ये तरुणावर कोयत्याने वार; ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करत हल्लेखोराला पकडलं..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती-इंदापूर रस्त्यावरील काटेवाडी येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशावर एका माथेफिरूने अचानक कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर या हल्लेखोराने त्याच कोयत्याने स्वतःवरही वार करत स्वतःला जखमी केलं आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

पवन गायकवाड (रा. जळोची, बारामती) असं या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. तर हल्लेखोराचं नाव अद्याप निष्पन्न झालेलं नसून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी बारामती-इंदापूर ही बस इंदापूरकडे जात असताना काटेवाडीजवळ एका माथेफिरूने बसमधून प्रवास करणाऱ्या पवन गायकवाड या प्रवाशावर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर काटेवाडी येथील उड्डाणपूलावर ही बस थांबवण्यात आली.

त्यावेळी या हल्लेखोराने बसमधून खाली येत स्वत:वरही वार केले. या घटनेत पवन गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दुसरीकडे वैयक्तिक वादातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पोलीस या प्रकरणानंतर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!