बारामती : न्यूज कट्टा
मागील काही दिवसात जालन्यात आजी-माजी आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अर्जुन खोतकर यांनी खाटिक समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर टीका केली. एखाद्या बोकडाला कापण्यापूर्वी खाटीक त्याला खायला देतो, त्यानंतर बोकड आपल्याला खायला मिळाल्याने खूश होतो. मात्र नंतर तो खाटीक वेळ आली की बोकडावर सुरा चालवतो. त्याच पद्धतीने कैलास गोरंट्याल हे खाटीक आहेत असं वादग्रस्त वक्तव्य खोतकर यांनी केले आहे. त्यानंतर खाटीक समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामती शहर पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत अर्जुन खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी निलेश पलंगे, अक्षय इंगुले, पार्थ गालिंदे, ब्रिजेश गालिंदे, जितेंद्र जवारे, महावीर जवारे, अमोल सोनवणे, संग्राम इंगुले, उमेश पलंगे, विकी खडके, बाळा इंगुले, मयूर ताडे आदी उपस्थित होते.
खोतकर यांनी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून खाटीक समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या समाजाबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरत असल्यामुळे खोतकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे करण इंगुले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खोतकर यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यांचं वक्तव्य हे विशिष्ट समूहाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं आहे. त्यातच ते स्वत: विधानसभा सदस्य असल्यामुळे या समाजाबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना वाढीस लागू शकते. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





