भीमाशंकर : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरनजीक दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टर मित्रांसह फिरायला आलेल्या एका डॉक्टर युवकाचा भिवेगाव कोंढवळ धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेला टूरिस्ट गाईडही वाहून गेला असून वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
सुबोध कारंडे (रा. चाकण, ता. खेड) असं मृत पावलेल्या डॉक्टरचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुबोध कारंडे हे आपल्या डॉक्टर मित्रांसह भीमाशंकरजवळ असलेल्या भिवेगाव कोंढवळ येथील धबधब्यात गेले होते. याचवेळी ते या धबधब्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला स्थानिक टुरिस्ट गाईड दिलीप वनघरे हाही या पाण्यात वाहून गेला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने शोधाशोध केल्यानंतर सुबोध कारंडे यांचा मृतदेह मिळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यटकांनी पावसाळ्यात धबधबे व पाण्याच्या परिसरात खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.





