परभणी : न्यूज कट्टा
पतीने आधी पत्नीचा फोटो स्टेटसला ठेवत त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली असं नमूद केलं आणि काहीच दिवसात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनार तांडा इथं घडली आहे. या घटनेनंतर परभणी जिल्हा हादरून गेला असून पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
विद्या विजय राठोड (वय ३२) असं या घटनेत मृत पावलेल्या पत्नीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही वर्षापूर्वी विद्या आणि तिचा पती विजय यांचा विवाह झाला होता. सुरुवातीला दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता. त्यांना दोन अपत्येही झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्यात कुरबुरी सुरु असत. मात्र मुलांच्या जन्मानंतर पती सुधारेल या आशेवर विद्या आपला प्रपंच चालवत होती.
नंतरच्या काळात त्यांच्यात वाद वाढत गेले. त्यामुळं कंटाळलेली विद्या आपल्या माहेरी रहायला गेली. आपण दूर राहिल्यानंतर तरी पतीला अद्दल घडेल असा विचार ती करत होती. मात्र गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत असताना विजय त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये बोलणं सुरु असतानाच त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यांच्यात कडाक्याचं भांडण सुरु झालं. त्यावेळी चिडलेल्या विजयनं आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तिच्यावर तब्बल १२ वार केले.यामध्ये विद्या ही गंभीररीत्या जखमी झाली.
तिच्या ओरडण्यामुळे जमा झालेल्या ग्रामस्थांनी तात्काळ तिला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, विद्याच्या मृत्युनंतर तिच्या दोन मुलांवरील छत्र हरपलं आहे. या घटनेनंतर परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीचा शोध सुरु केला आहे.
जिवंत पत्नीचं श्रद्धांजलीचं स्टेटस अन खून
विद्याशी वाद झाल्यानंतर तिचा पती विजय याने रविवारी आपल्या मोबाईलवर तिच्या फोटोसह भावपूर्ण श्रद्धांजली बायको असं नमूद करत स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर भांडण झाल्यावर लोक डीपी हटवतात, पण मी लोकांनाच हटवतो असंही स्टेटस त्यानं बुधवारी ठेवलं होतं. त्यानंतर गुरुवारीच त्यानं आपल्या पत्नीचा खून केला. त्यामुळं हा संपूर्ण हत्येचा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे.





