बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला सोशल मिडीयाचा नाद भलताच महागात पडला आहे. या शिक्षकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून महिलेकरवी नग्न व्हिडीओ कॉल करत त्यांनाही नग्न होण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर संबंधित संभाषणाचे आणि व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा. बर्गेवस्ती, आळंदी रोड, चाकण) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. कोकणे चौक, चाकण) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील प्राथमिक शाळेत एक ५४ वर्षीय शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांवर आपले खाते काढलेले आहे.
मे महिन्यात शाळांना सुट्ट्या असताना त्यांना फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर संबंधित खात्यावरून दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. याच दरम्यान, याच खात्यावरून इन्स्टाग्रामवरही रिक्वेस्ट आली. या शिक्षकांनी तीही स्वीकारली. काही दिवसानंतर या खात्यावरून एका महिलेने त्यांना व्हिडीओ कॉल केले. नग्न अवस्थेतील या महिलेने संबंधित शिक्षकांना स्वत:चे कपडे काढण्यास भाग पाडले. त्यांनी नकार दिल्यानंतर माझ्याशी झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल करीन अशी धमकी या महिलेकडून देण्यात आली. त्यामुळं या शिक्षकांनी स्वत:चेही कपडे काढले.
या प्रकारानंतर काही दिवसांनी अभिषेक पांचाळ याने या शिक्षकाला फोन करून तुमचे नग्न व्हिडीओ माझ्याकडे आहेत असं सांगत त्यांना काही फोटो पाठवले. त्यानंतर पांचाळ याने आणखी काही व्हिडीओ पाठवत दोन लाख रुपये द्या अन्यथा तुमचे व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली. समाजात बदनामी व्हायला नको म्हणून या शिक्षकाने सुरुवातीला काही रक्कम पाठवली. त्यानंतर पांचाळ याने त्याचा मित्र सिद्धांत गगनभिडे याच्या खात्यावर ३० हजार रुपये मागवले.
७ जुलै रोजी अभिषेक आणि सिद्धांत हे दोघे थेट या शिक्षकाच्या गावात आले. त्यांनी फोन पेवरून ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा दि. २९ ऑगस्ट रोजी अभिषेकने संबंधित शिक्षकाला फोन करून गावात आल्याचं सांगत आज १ लाख रुपये द्या असं सांगितलं. आज पैसे द्या त्यानंतर तुमचा विषय मिटवून टाकतो, पैसे मिळाले नाहीत तर तुमचा व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली.
या घटनेनंतर संबंधित शिक्षकाने या प्रकाराची माहिती आपल्या पुतण्यासह इतरांना दिली. त्यानंतर याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अभिषेक पांचाळ आणि सिद्धांत गगनभिडे या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करत आहेत.





