BARAMATI BREAKING : बारामतीत महिला पोलीस २० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; पोलीस दलात उडाली खळबळ

बारामती : न्यूज कट्टा

बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी महिलेला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडलं.  गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी या पोलीस कर्मचारी महिलेने लाच मागितली होती. आज दुपारी पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना ही महिला पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकली. दरम्यान, बारामती तालुका पोलीस ठाण्याचा कारभार गेल्या काही दिवसात चर्चेत आहे. अशातच ही कारवाई झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अंजना बिभीषण नागरगोजे (वय ३८, रा. निमिर्ती विहार, रुई, बारामती)  असं या महिला हवालादाराचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू, सासरे आणि मेहुण्यावर २ सप्टेंबर २०२५ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास हवालदार अंजना नागरगोजे या करत होत्या.

तक्रारदारांना गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी नागरगोजे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याची मागणी नागरगोजे यांनी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फोनद्वारे तक्रार केली. या तक्रारीची आजच पडताळणी करून पोलीस ठाण्यातच २० हजारांची लाच घेताना अंजना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी नागरगोजे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले, सहाय्यक उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महिला पोलीसाकडून पोलीस ठाण्यातच लाच स्विकारण्याचा प्रकार समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!