PUNE CRIME : बापाकडून क्लीनरचं अपहरण; आईनं पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडली, पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा मस्तवालपणा

पुणे : न्यूज कट्टा

बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कुटुंबीयांचा नवीन उद्योग समोर आला आहे. पूजाच्या वडिलांनी चक्क नवी मुंबईत कारला धडक देणाऱ्या ट्रकच्या क्लीनरचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर पूजाच्या आईने कुत्री सोडल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, पूजाच्या वडिलांनी अपहरण केलेला क्लीनर पुण्यात मिळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलीप खेडकरसह त्याच्या साथीदारावर आणि पूजाच्या आईवरही गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्री मुलुंड-ऐरोली रस्त्यावर एका लँड क्रूझरला (क्र. एमएच १२ आरपी ५०००) एका सीमेंट मिक्सर ट्रकची किरकोळ धडक बसली. या कारमध्ये दोन व्यक्ती, तर ट्रकमध्ये चालक चंदकूमार चव्हाण आणि क्लीनर प्रल्हाद कुमार हे दोघे होते. अपघातानंतर दोन्ही बाजूंनी वाद सुरू झाला. आपल्या कारचे मोठे नुकसान झाले असून त्यांची नुकसान भरपाई द्यावी असं कारमधील व्यक्तींचं म्हणणं होतं. शेवटी कारमधील दोघांनी पोलिस ठाण्यात जायचं असल्याचं सांगत ट्रकमधील क्लीनरला जबरदस्तीने कारमध्ये बसवत ट्रकचालकाला मागे यायला सांगितलं.

दरम्यानच्या काळात ही कार गायब झाली. त्यामुळं ट्रकचालकाने आपले मालक विलास ढेंगरे यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. ढेंगरे यांनी नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत कारच्या नंबरसह घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरटीओची मदत घेत या कारचा शोध सुरू केला. पोलिसांना पुण्यातील बाणेर येथील पूजा खेडकरच्या घरासमोर ही कार आढळून आली.

पोलिसांच्या पथकाने या बंगल्यात चौकशीचा प्रयत्न केला, मात्र पूजाच्या आईने त्यांना सहकार्य करण्यास नकार देत पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सातत्याने सांगूनही पूजाची आई मनोरमा खेडकर ही गेट उघडत नव्हती. शेवटी तिने अपहरण केलेल्या प्रल्हाद कुमार कुमारला बाहेर पाठवले. दिलीप खेडकर आणि त्याचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे या दोघांनी प्रल्हाद कुमारचं अपहरण करत त्याला एका खोलीत डांबून ठेवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दिलीप खेडकर, त्याचा साथीदार प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर अपहरणासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तर तपासात सहकार्य न करता आरोपींना पळून लावण्यास मदत केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस प्रमाणपत्रांद्वारे आयएएस अधिकारी झालेल्या पूजा खेडकरचं कुटुंबीय या प्रकरणामुळे आणखी चर्चेत आलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!