PUNE GANGWAR : न्यायालयात बंडू आंदेकर यांनी व्यक्त केली एन्काउंटरची भीती; दुसऱ्याच दिवशी आयुष कोमकर हत्याप्रकरणी कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण

पुणे : न्यूज कट्टा

पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. काल न्यायालयात आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत आपल्या लहान मुलाला पोलिसांकडून धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी कृष्णा आंदेकर पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात शरण आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तेरा इतकी झाली आहे.

५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याची पुण्यातील नाना पेठेतील राहत्या घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच ही हत्या घडवली गेल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मेरगू यांना ठिकठिकाणाहून अटक केली.

दरम्यान, बंडू आंदेकर यांना काल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या लहान मुलाला हजर व्हायला सांगा नाहीतर त्याचा एन्काउंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज कृष्णा आंदेकरने पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी त्याला अटक करत तपासाला सुरुवात केली आहे.

कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर हा आयुष कोमकर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याने रेकीची जबाबदारी सांभाळतानाच हल्लेखोरांना सूचना दिल्या होत्या असेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जाणार असून तो गेली ११ दिवस कुठे होता, त्याला कुणी मदत केली, त्याचा गुन्ह्यातील सहभाग अशा अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!