बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून दीड वर्षात तीनपट परताव्याचं आश्वासन देत बारामतीत अनेकांची फसवणूक झाली आहे. यातील एका गुंतवणूकदाराने आपली रक्कम मिळावी यासाठी बारामतीतील पोलिस यंत्रणांकडे अनेकदा हेलपाटे मारले. मात्र आजवर कोणतीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या कंपनीकडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी खास कार्यक्रम होतो आणि गुंतवणुकीनंतर हक्काची रक्कम मिळवण्यासाठी ससेहोलपट सोसावी लागते असेच चित्र आहे.
बारामतीतील एका गुंतवणूकदाराला येथील काही लोकांनी ‘ब्लॅक औरा’ नावाच्या या कंपनीत गुंतवणुकीसाठी आग्रह धरला. दरम्यानच्या काळात या कंपनीचे मालक, संचालक बारामतीत आले आणि त्यांच्या उपस्थितीत बारामतीतील नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार झाले. त्यांनी दीड वर्षात तीनपट परतावा मिळून तुम्ही ऐशोआरामाचं आयुष्य जगा असं सांगत गुंतवणूकदारांना भुलवले. त्याचवेळी बारामती आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या काहीजणांना पुढे करून हे कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
या स्थानिक प्रतिनिधींनी संबंधित गुंतवणूकदाराकडे सातत्याने पाठपुरावा करत गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. त्यावेळी या गुंतवणूकदाराला कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी एक खाते क्रमांक देत त्यावर रक्कम जमा करण्यास सांगितली. त्रयस्थ व्यक्तीला रक्कम पाठवण्यास सांगितल्यामुळे त्यांना शंका आली. पण त्यांनी सगळेजण याच खात्यावर पैसे पाठवतात, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही खात्यावरच पैसे पाठवत आहात, त्यामुळे काळजी करू नका असं सांगत त्यांना रक्कम पाठवण्यास भाग पाडलं.
या गुंतवणूकदाराने तीन महिन्यात काही लाख रुपये स्थानिक प्रतिनिधींनी सांगितलेल्या ‘भूपेंद्र मनी ट्रान्सफर’ नामक खात्यावर पाठवले. त्यानंतर त्यांना एक तथाकथित वेबसाईटवर अकाऊंट सुरू करून देण्यात आले. त्या ठिकाणी त्यांनी गुंतवलेली रक्कम दर्शवली जात होती. ही रक्कम पुढे टप्प्याटप्प्याने वाढलेली दिसेल असंही सांगायला स्थानिक प्रतिनिधी विसरले नाहीत.
एवढ्यावर न थांबता तुम्हाला आणखी रक्कम गुंतवायची असेल तर नवीन युझर व पासवर्ड मिळेल. तसेच दरदिवशी एक टक्का परतावा मिळेल अशी बतावणी करण्यात आली. संबंधित गुंतवणूकदार दररोज कंपनीने दिलेल्या वेबसाईटवर ही रक्कम वाढत असल्याचे पाहत होते. वाढीव रक्कम पुन्हा गुंतवा म्हणजे आणखी फायदा होईल असं आमिष दाखवत या कंपनीच्या बारामतीत काम करणाऱ्या प्रतिनिधीच्या मालकीच्या संगणक प्रशिक्षण केंद्रात नवीन युझर आयडी व पासवर्ड सुरू करून दिले.
दरम्यानच्या काळात कंपनीने दिलेली वेबसाईट अचानक बंद झाली. त्यानंतर गुंतवणूकदाराने स्थानिक प्रतिनिधींकडे संपर्क साधला असता दोन दिवसात वेबसाईट सुरू होईल असं सांगण्यात आलं. दोन दिवसांनी ही वेबसाईट सुरू झाली. मात्र नंतर पुन्हा पुन्हा ही वेबसाईट बंद पडत होती. कालांतराने ही वेबसाईट कायमची बंद पडली. त्यामुळे या गुंतवणूकदाराने स्थानिक प्रतिनिधीकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी काही दिवस थांबा सांगणारे स्थानिक प्रतिनिधी नंतर मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. नंतरच्या काळात त्यांनी गुंतवणूकदारांचे फोन उचलणेही बंद केले.
हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार हतबल झाले. स्थानिक प्रतिनिधी बारामती आणि परिसरात बिनधास्त वावरताना दिसतात. मात्र गुंतवणूकदारांच्या रकमेचं पुढे काय हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यानंतर न्यायासाठी पोलिस यंत्रणेकडे गेलेल्या या गुंतवणूकदाराने कित्येकदा तक्रारी अर्ज देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही.





