वडगाव निंबाळकर : न्यूज कट्टा
पैशांचं आमिष दाखवून दोन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्यांचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. चारचाकीतून घेऊन चाललेल्या दोन महिलांची सुटका करतानाच त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून स्विफ्ट कारसह अन्य ऐवज जप्त करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील करंजेपुल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
सुयोग हिंदुराव खताळ आणि प्रीतम आप्पासाहेब घुले ( दोघेही रा. कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी या प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडील स्विफ्ट कार (क्र. एमएच 11 एमडी 8055) पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, करंजेपूल बसस्टॉप परिसरात लाल रंगाची आणि काळ्या काचा असेलेली एक कार संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस पथकाला मिळाली. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत ही कार थांबवली.
कारमध्ये तपासणी केल्यानंतर दोन पुरुष आणि दोन महिला बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांकडून या महिलांची चौकशी केल्यानंतर त्यांना पैशाचे आमिष दाखवून पुण्यातील हडपसर येथून लोणंद येथे आणल्याचे समोर आले. तसेच या दोघा महिलांना जबरदस्ती करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सुयोग खताळ आणि प्रीतम घुले दोघांची चौकशी करत त्यांना ताब्यात घेतले.
संबंधित पीडित महिलांच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), १४३(३), १४४(२), ३(५) तसेच महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या दोघांच्या चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
पोलिस निरीक्षक विलास नाळे, वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, उपनिरीक्षक डी. एस. वारुळे, पोलीस हवालदार अमोल भोसले, एस. पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव व नागनाथ परगे यांनी ही कारवाई केली.





