बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
दीड वर्षात तीनपट रक्कम देण्याच्या आमिषाने ब्लॅक औरा कंपनीने अनेकांची फसवणूक केली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना केवळ भुलवण्याचं काम केलं. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना रक्कम मिळालीच नाही. उलट जी रक्कम गुंतवली, त्यात वाढ झाल्याचं दाखवणाऱ्या वेबसाईटचा घोटाळा झाला. कालांतराने ही वेबसाईटच बंद पडली आणि गुंतवणुकीसाठी पुढे पुढे करणारे कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी टाळाटाळ करू लागले.
बारामतीत ब्लॅक औरा या कंपनीने अलिशान हॉटेलमध्ये सेमिनार घेत गुंतवणूकदारांना कसा फायदा होणार याचं सादरीकरण केलं. त्यासाठी कंपनीचे मालक म्हणवणारे काहीजण उपस्थित राहिले. त्यांनी मोठेपणाने तुम्ही पैसे गुंतवा आम्ही सांगितल्याप्रमाणे परतावा देऊ असं आमिष दाखवलं. इतक्यावरच न थांबता कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी कोण हेही दाखवून देत, तुम्ही यांच्याशी बोलत रहा असंही सांगितलं.
सेमिनारनंतर स्थानिक प्रतिनिधींनी गुंतवणूकदारांशी संपर्क वाढवत तुम्ही रक्कम जमा करा आणि दीड वर्षात तीनपट फायदा मिळवा असं सांगत सतत तगादा लावला. बारामतीतील एका गुंतवणूकदाराने काही लाख रुपये गुंतवले. ते एका भूपेंद्र मनी ट्रान्सफर नावाने असलेल्या खात्यावर पाठवण्यास सांगितले. पुढे वेबसाईट आणि त्याचा युझर आयडी व पासवर्ड या गुंतवणूकदाराला देण्यात आला. वेळ मिळेल तेव्हा हे गुंतवणूकदार आपली रक्कम किती झाली याची तपासणी करत होते. पैशात होणारी वाढ त्यांना गुंतवणुकीचं समाधान देणारी होती.
गुंतवलेल्या रकमेइतका फायदा झाल्याचं दिसल्यानंतर स्थानिक प्रतिनिधी त्यांना भेटले. त्यांनी नवीन युझर आयडी आणि पासवर्ड देऊन आणखी रक्कम गुंतवण्यास या गुंतवणूकदाराला भाग पाडले. कालांतराने ही वेबसाईट अधूनमधून बंद पडू लागली. आपली फसवणूक होतेय की काय अशी शंका आल्यानं गुंतवणूकदारांनी स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधत याबद्दल माहिती विचारली. वेबसाईटचे काम सुरू आहे, लवकरच सुरू होईल, काळजी करू नका असं उत्तर मिळाल्यानं गुंतवणूकदार निर्धास्त झाले.
पुढे काही दिवसात ही वेबसाईट पुन्हा बंद पडली. मात्र पुन्हा नंतर सुरूच झाली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक प्रतिनिधींना संपर्क साधत याबद्दल विचारणा केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. काही दिवस थांबा, पैसे मिळतील असंही सांगितलं. नंतर त्यांनी गुंतवणूकदारांचे फोन उचलणेही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तक्रारीची आजतागायत दखल घेतली गेली नाही, हे विशेष.





