बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील १२ वर्षांच्या जैनब शरीफ शेख हिला सिकल सेल या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं जैनबच्या उपचारांसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत समाजातील दानशूरांनी जैनबसाठी मदतीचा ओघ सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी संगीत रजनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या शरीफ शेख यांच्या बारा वर्षांच्या जैनब हिला सिकल सेल हा दुर्मिळ आजार झाला आहे. तिच्यावर पुण्यातील बाणेर येथील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट हि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च येणार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शेख कुटुंबीयांनी या शस्त्रक्रियेसाठी मदतीचं आवाहन केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर जैनबच्या मदतीसाठी शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी बारामती येथील नटराज नाट्य कलामंदिरात अरविंद देशपांडे प्रस्तुत रागाज म्युझिकल संगीत रजनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम जैनबच्या उपचारांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाची तिकिटे घेऊन जैनबला मदतीचा हात द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
दरम्यान, खर्च जरी आवाक्याबाहेर असला तरी माझ्या मुलीचा जीव वाचविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे, उद्योजक, व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी, नोकरदार वर्ग व सर्व सामान्य नागरिकांनी सढळ हाताने शक्य असेल तेवढी मदत करावी असं आवाहन शेख कुटुंबीयांनी केलं आहे.





