अहिल्यानगर : न्यूज कट्टा
जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस खात्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला असून पुढील कार्यवाहीसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) असं या पोलिस निरीक्षकांचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, एका ३० वर्षीय तरुणीने प्रताप दराडे यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पालघर येथील फार्म हाऊस, तसेच मुंबईतील जोगेश्वरी येथे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार केली आहे. लग्नाचं आमिष दाखवत दराडे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
सुरुवातीला लग्नाचं आश्वासन देण्यात आलं. नंतर मात्र लग्नाला नकार दिला. तसेच आता आपल्यात जे झालं ते सगळं विसरून जा नाहीतर तुला जीवे मारीन अशी धमकी दराडे यांनी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. वारंवार विनवणी करूनही दराडे यांनी तुला काय करायचं ते कर असं म्हणत लग्नाला नकार दिला. त्यामुळं संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार अहिल्यानगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक असलेल्या प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यावरच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.





