बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर थांबलेल्या एका कारच्या काचा फोडून त्यातील तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी घडली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसातील ही दुसरी घटना असून पोलिसांनी ठोस उपाययोजना राबवण्याची अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दि. २२ सप्टेंबर रोजी शिंगाडे यांनी बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये काढले. ते आपल्या कारमध्ये ठेवून ते भिगवण रस्त्यावरील एका दुकानात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परतल्यानंतर त्यांना आपल्या कारच्या काचा फुटल्याचं पाहायला मिळालं.
कार उघडून पाहिल्यानंतर त्यांना कारमधील रोकड गायब असल्याचं आढळून आले. त्यांनी तात्काळ बारामती शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करताना घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चोरीचा हा प्रकार कैद झाला असून त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हे चोरटे परप्रांतीय असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसात कारच्या काचा फोडून चोरीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. बारामतीत अशा पद्धतीने चोरी करणारी टोळी तर सक्रिय झालेली नाही ना अशीही भीती व्यक्त होत आहे.





