बारामती : न्यूज कट्टा
सध्या नवरात्र उत्सव सुरू असून अनेक भाविक नऊ दिवस उपवास करत असतात. त्या निमित्तानं उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र उपवासाच्या निमित्तानं भगरीच्या पीठाच्या भाकरी खाणं भाविकांच्या जीवावर बेतलं आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील आठ महिला व पुरुषांना भगरीच्या पीठाच्या भाकरी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे. सध्या या सर्वांवर डोर्लेवाडी, बारामती येथे उपचार सुरू असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील एका दुकानातून स्थानिकांनी भगरीचे पीठ विकत घेतले होते. त्याच्या भाकरी खाल्ल्यानंतर अचानक चक्कर, उलट्या, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन महिलांना जास्त त्रास होऊ लागल्यानं बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या किराणा दुकानावर धाड टाकत भगरीचे पीठ ताब्यात घेतले आहे. हे पीठ तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली. दुसरीकडे भगरीचे पीठ आणि पाणी मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये जिवाणूंची निर्मिती होऊन त्याचा त्रास संबंधितांना झाला असावा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, या दुकानातून ज्यांनी भगरीचे पीठ खरेदी केले आहे, त्यांनी ते खाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा याबाबत सतर्क असून सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.





