पुणे : न्यूज कट्टा
प्रेमाच्या नात्यात संशय डोकावल्यानंतर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचं धक्कादायक उदाहरण पिंपरी चिंचवड परिसरात पाहायला मिळालं आहे. सहा वर्षांपासून प्रेम संबंधात असलेल्या तरुणीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो पाहिल्यानं संतापलेल्या प्रियकराने चाकूने वार करत तिचा खून केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. संबंधित तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे एकत्र आलेले असताना हा प्रकार घडला आहे.
मेरी मल्लेश तेलगु (वय २६, रा. देहूरोड) असं मृत तरुणीचं नाव असून आरोपीचं नाव दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) असं आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेरी तेलगु ही डी-मार्टमध्ये काम करायची. तर दिलावर सिंग हा हॉटेल व्यवसायात होता. सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे नेहमी भेटत असत. तसेच एकत्र फिरायलाही जायचे.
दरम्यान, दि. १० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी दिलावर सिंगने तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वाकडमधील एका लॉजमध्ये नेले. दोघांनी तिथे केक कापून सेलिब्रेशन केले. यावेळी दिलावर सिंग यानं तिला तुझे कुणाशी संबंध आहेत का याबद्दल विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिलावरने मेरीचा मोबाईल तपासला असता त्याला मेरीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अश्लील फोटो दिसले.
संतापलेल्या दिलावरने तिथेच असलेल्या केक कापायच्या चाकूने मेरीवर वार केले. यावेळी त्याने सोबत आणलेल्या लोखंडी पानानेही तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मेरी गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दिलावर सिंग थेट कोंढवा पोलिस ठाण्यात गेला आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. “मी माझ्या प्रेयसीचा खून केला,” असं सांगत त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. वाकड पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन पाहणी केली असता, खोलीत मेरीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.
आरोपी दिलावर सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. दोघांमध्ये मागील काही काळापासून वाद सुरू होते. दिलावर सिंग याला मेरीबद्दल संशय होता. त्यातूनच या प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट झाला आहे. या घटनेनंतर वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





