बारामती : न्यूज कट्टा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाई हल्ल्याचा निषेध केल्याचा राग मनात ठेवून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बारामती शहरात घडला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत राजेंद्र पवार यांनी याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण साळुंखे, वैभव रविंद्र साळुंखे, शुभम साळुंखे (तिघेही रा. भवानीनगर ता.इंदापूर,जि.पुणे), अक्षय चव्हाण (रा.तांदुळवाडी), राहुल मदने (रा.प्रगतीनगर, बारामती) कालीदास ढाणे ( रा.भवानीनगर ता.इंदापूर,जि.पुणे) या सहाजणांवर भारतीय न्यायसंहिता कलम १८९ (१), १८९ (२),१९०,१२६,३५२,३५१ (२), ३५१ (३), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१),(३) अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकत मारहाणीचा प्रयत्न झाल्याची घटना झाली होती. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवला होता. त्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता. बारामतीतही संभाजी ब्रिगेडकडून भिगवण चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली होती.
याचा राग मनात धरून प्रशांत पवार हे बारामती शहरातील सातव चौकात चहा घेण्यासाठी थांबलेले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पवार यांनी दिली. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी किरण साळुंखे, वैभव साळुंखे, शुभम साळुंखे, अक्षय चव्हाण, राहुल मदने, कालीदास ढाणे या सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.





