यवत : न्यूज कट्टा
दौंड तालुक्यातील चौफुला परिसरातील परिसरातील रेणुका कला केंद्रामध्ये एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रागाने का पाहत होतास असा जाब विचारत या युवकावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी यवत पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
साहील बापू जाधव (वय १९, रा. पाटस) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, साहील जाधव हा चौफुला येथील रेणुका कला केंद्रामध्ये गेला होता. त्यावेळी त्याची याच ठिकाणी असलेल्या युवकांशी वाद झाला. आरोपी आदिनाथ उर्फ आदित्य ईश्वर गिरमे, रोहित राजू भिसे (दोघे रा. पाटस) आणि दोन अनोळखी साथीदारांनी साहीलला तू पाटस टोलनाक्यावर आमच्याकडे रागाने का पाहत होता असा जाब विचारत लोखंडी कोयत्याने हल्ला केला.
यामध्ये साहीलच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर घाव बसून तो जखमी झाला आहे. जखमी अवस्थेतच त्याने यवत पोलिस ठाण्यात जाऊन या संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य ईश्वर गिरमे, रोहित राजू भिसे आणि अन्य दोन साथीदार आशा चौघांवर गंभीर दुखापत व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.





