बारामती : न्यूज कट्टा
पोलिस खात्याच्या चुकीच्या कृत्यांबद्दल आवाज उठवल्याचा राग मनात धरून पोलिस जीप अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी केला आहे. या संदर्भात आज मोहिते यांच्यासह विविध संघटना व पक्षाचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी अरेरावीची भाषा करत तक्रार घेण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रकारानंतर अनिकेत मोहिते यांनी नाळे यांच्या बदलीची मागणी करत या प्रकाराबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
अनिकेत मोहिते हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ते वेळोवेळी आवाज उठवत असतात. तसेच विविध गरजूंना मदतीसाठी पुढे येत असतात. या दरम्यान, त्यांनी वेळोवेळी बारामतीतील पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. बुधवार दि. २२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अनिकेत मोहिते हे इंदापूर रस्त्यावर थांबले असताना पोलिस जीप त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. पुढे जाऊन ही जीप थांबली. त्यानंतर पुन्हा जीप वळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही वेळाने ही पोलिस जीप निघून गेली.
आपण वेळोवेळी पोलिसांच्या कृत्यांविरोधात आवाज उठवत असतो, म्हणून अशा पद्धतीने माझ्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अनिकेत मोहिते यांनी केला आहे. आज याबाबत अनिकेत मोहिते यांच्यासह विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक विलास नाळे हे येत आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला, असं येथील ठाणे अंमलदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोहिते यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते वाट पाहत थांबले.
तब्बल चार ते पाच तास वाट पाहिल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास नाळे हे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी अनिकेत मोहिते व उपस्थित कार्यकर्त्यांना तुम्ही इथे गर्दी कशाला केली अशी विचारणा केली. त्यावर तक्रार देण्यासाठी आल्याचं सांगितल्यानंतर नाळे यांनी उपस्थितांना अरेरावीची भाषा वापरत तक्रार घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक नाळे यांनी जाणीवपूर्वक तक्रार घेण्यास नकार देत अरेरावीची भाषा वापरल्याचे अनिकेत मोहिते यांनी सांगितले. या प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनिकेत मोहिते व उपस्थित कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवत घडल्या प्रकाराबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक नाळे यांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असून त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणीही अनिकेत मोहिते यांनी केली आहे.





