बारामती : न्यूज कट्टा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या नावांची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांना सामावून घेणारा, गट-तटाचे राजकारण न करणारा आणि पक्ष व नेत्यांप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिक काम करणाराच तालुकाध्यक्ष असावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पक्ष संघटनेत बदल करण्याचे धोरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यासाठी नवीन अध्यक्षांची नेमणूक केली जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या पदासाठी करण खलाटे, लालासाहेब माळशिकारे, भरत खैरे, किरण तावरे, विक्रम भोसले, डॉ. अनिल सोरटे या नावांचा मेसेज सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे यांच्यापैकी एकाला अध्यक्षपदाची संधी मिळणार की ऐनवेळी नवीन नाव पुढे येणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणूक काळात स्थानिक पदाधिकारी आणि गावपुढाऱ्यांच्या वागणुकीचा पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक, गावपातळीवर गटातटाचे राजकारण, स्वत:च मोठा नेता असल्याचा आविर्भाव अशा अनेक गोष्टींमुळे मतदारांनी स्थानिक नेत्यांना धडा शिकवला होता. त्यामुळे आता नव्याने तालुकाध्यक्ष निवडताना सर्व बाबींचा विचार व्हायला हवा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी पक्षीय पातळीवर मोठे बदल झालेले आहेत. पूर्वी एकसंघ असलेली राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली आहे. अर्थातच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनाही पर्याय निर्माण झालेला आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत योग्य पद्धतीने कामकाज करणारा, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारा तालुकाध्यक्ष निवडणे आवश्यक आहे. पक्षाच्या वाढीसाठी सक्षमपणे काम करणारी व्यक्ती तालुकाध्यक्षपदी निवडल्यास त्याचा फायदा पक्षाला होणार आहे.
दुसरीकडे पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी आणि कंत्राटे मिळवण्यासाठी न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजून घेणारा, पक्ष आणि नेत्यांबद्दल निष्ठा बाळगणारा, गटातटाचे राजकारण न करणारा व्यक्ती तालुकाध्यक्ष होणे आवश्यक आहे. त्याचवेळी पक्ष संघटनेचं काम तितक्याच जोमाने करून नव्या-जुन्याची सांगड घालणेही तितकेच गरजेचे असणार आहे. तसेच स्वच्छ प्रतिमा, समाजातील स्थान याचाही विचार होणे आवश्यक आहे.
आज व्हायरल झालेल्या नावांमध्ये सर्वांनीच विविध पदांवर काम केले आहे. त्यातील काही नावांबाबत कार्यकर्ते सकारात्मक आहेत. त्याचवेळी काही नावांबद्दल मात्र उलटसुलट चर्चा आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून नवीन तालुकाध्यक्षपदाबाबत विविध अपेक्षा व्यक्त होत असून आता अजितदादा कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठेकेदार आणि गोडबोले अध्यक्ष नको
लोकसभा निवडणुकीत मलिदा गॅंगची सर्वत्र चर्चा झडली होती. निवडणूक काळात ही गॅंग बाजूला झाली. मात्र आता पुन्हा ही गॅंग सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे पदे मिळवून कोट्यवधींची कंत्राटे घेणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच काहीजण केवळ लोकांना गोड बोलण्यात धन्यता मानतात, प्रत्यक्षात लोकांची कामे करत नाहीत. आज करतो, उद्या करतो असे डायलॉग लोकांना ऐकावे लागतात. त्यामुळे अशा लोकांना संधी न देता योग्य, सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती या पदासाठी निवडण्याची मागणी होत आहे.





