बारामती : न्यूज कट्टा
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी बुलेटच्या सायलन्सरमधून जाळ आणि धूर काढत दहशत निर्माण करणाऱ्या चार बुलेटस्वारांना बारामती तालुका पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. कटफळ येथील पालखी मार्गाखालील पूलाखाली रेसिंग रिल बनवणाऱ्यांच्या चार बुलेट पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
कटफळ येथील पालखी मार्गावरील पूलाखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रिल बनवण्यात आली होती. ही क्लिप दि. २० ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत या रिलमध्ये वापरण्यात आलेल्या चार बुलेट दुचाकी (क्र. एम.एच ४२ बीएच ७४०४, एमएच १२ पीएल ७६३७, एमएच १२ केएम ८५९२, एमएच ४२ बीए ५५५३) ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित चालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या चारही बुलेट पुढील १५ दिवसांसाठी पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. व्हायरल होण्याच्या स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग, धूर काढणे आणि आवाज वाढवणे या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून वाहतुकीलाही मोठा धोका अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अशा वाहनांवर आणि चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान, पेन्सिल चौक, एमआयडीसी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालविणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे मिळून आल्यास तात्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.





