मुंबई : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाला क्रीडा क्षेत्रातील संघटनांचा जबरदस्त पाठिंबा लाभला असून, त्यांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांची भक्कम पकड कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.
एकूण ३१ क्रीडा संघटनांपैकी तब्बल २२ पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दर्शविला होता. या पाठिंब्यातून क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू आणि प्रशासकांनी अजितदादांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पुन्हा एकदा दृढ केला आहे. अजित पवार यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखालील संघटनेवर असलेला एकमताचा विश्वास अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीपूर्वी भाजप-युतीतील समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या चर्चेत मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलला काही पदांचा वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे महायुतीत समन्वय राखला गेला आणि निवडणुका निर्विघ्न पार पडल्या. राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात अजित पवार यांचा दीर्घ अनुभव, तडजोडीचे आणि एकत्रिततेचे राजकारण ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. राज्यातील क्रीडा आस्थापनांचे सशक्तीकरण, खेळाडू कल्याण आणि पारदर्शक व्यवस्थापन या बाबींमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटनांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
आता नव्या कार्यकारिणीसमोर राज्यातील खेळाडू घडविणे, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा उभारणे आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनविणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि तज्ञ वर्तुळात व्यक्त केला जात आहे.





