पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी म्हणून तब्बल २ कोटींची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला असून ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील पेठ रस्त्यावरील उंटाड्या मारुती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार आणि त्याच्या वडिलांवर एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याच्याकडे होता. तपासादरम्यान, चिंतामणी याने गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी, तसेच जामीन मिळवून देण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.
१ कोटी रुपये स्वत:साठी आणि उर्वरीत १ कोटी रुपये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देणार असल्याचे त्याने सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. २७ ऑक्टोबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पैशांची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. याचदरम्यान, प्रमोद चिंतामणी याने पैशांची मागणी वाढवण्यास सुरुवात केली.
तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर रविवारी सापळा रचला. तत्पूर्वी प्रमोद चिंतामणी आणि तक्रारदार यांच्यात चर्चा होऊन ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार पुण्यातील पेठ रस्त्यावरील उंटाड्या मारुती मंदिरासमोर ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना प्रमोद चिंतामणी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून सॅमसंग आणि आयफोन कंपनीचे दोन महागडे मोबाईल, ३६०० रुपये रोख आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रमोद चिंतामणी याने थेट २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार पुढे आल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:बरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यासाठीही लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील आर्थिक गुन्हे शाखा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून या प्रकरणी काय कारवाई होते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.





