PUNE GANGWAR : गणेश काळे हत्या प्रकरणाचं ससून कनेक्शन; हल्लेखोरांनी कृष्णा आंदेकरची भेट घेत केलं होतं हत्येचं प्लॅनिंग..?

पुणे : न्यूज कट्टा

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं मोठं प्लॅनिंग केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर ससून रुग्णालयात आंदेकर टोळीच्या कृष्णा आंदेकरची हल्लेखोरांनी भेट घेतली होती. या भेटीतच गणेश काळेच्या हत्येचा प्लॅन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं तुरुंगात असतानाही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये वनराज आंदेकरची नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. यामध्ये कोमकर आणि गायकवाड टोळीचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर वनराजच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार आंदेकर टोळीकडून घेण्यात आला होता. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येला दोन महीने उलटत नाही तोच वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, मयूर दिगंबर वाघमारे या तिघांना अटक केली आहे. तसेच बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णा ऊर्फ कृष्णराज आंदेकर, स्वराज वाडेकर, आमीर खान यांच्यावरही गुन्हा दाखल असून दोन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, गणेश काळेच्या हत्येपूर्वी कृष्णा आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणीदरम्यान गणेश काळे हत्या प्रकरणातील आरोपींनी ससून रुग्णालयात कृष्णा आंदेकरची भेट घेतली होती. या भेटीतच गणेश काळेच्या हत्येचा प्लॅन रचला गेला अशी चर्चा आता होत आहे. दुसरीकडे आंदेकर-कोमकर टोळीच्या वादात तिसरा खून झाल्यामुळे पुणे शहर हादरून गेले असून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!