पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रमोद चिंतामणी याला ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडे दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणाचा तपास प्रमोद चिंतामणी याच्याकडे होता. या प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदतीसाठी प्रमोद चिंतामणी याने तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातील १ कोटी रुपये स्वत:साठी आणि उर्वरीत १ कोटी रुपये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी असे दोन कोटी रुपये देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता.
तक्रारदाराशी झालेल्या तडजोडीनंतर ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या भोसरी येथील घराची झडती घेतल्यानंतर ५१ लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि मालमत्तांचे दस्तऐवज मिळून आले.
प्रमोद चिंतामणी याच्या लाच प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांसह संपूर्ण पोलिस खात्याला मान शरमेने खाली घालावी लागली. प्रमोद चिंतामणीने आतापर्यंत भरपूर माया जमवल्याचे या प्रकारानंतर समोर आले. या पार्श्वभूमीवर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.





