BARAMATI POLITICS : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या बारामतीत राजकीय घडामोडींची शक्यता; राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार..?

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा  

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडणार आहेत. बारामतीतही निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण आहे. त्यामुळे या पदावर संधी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते जय पवार यांचेही नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. बारामतीच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित केला जाईल अशी चर्चा होत आहे. बारामतीत राष्ट्रवादीकडून किरण गुजर, सुभाष सोमाणी, सचिन सातव, जयसिंग देशमुख यांचीही नावे चर्चेत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींची शक्यता आहे. त्यातच दुसरीकडे दि. १० नोव्हेंबरपासून नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर अवघे काहीच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासह अन्य उमेदवारांबाबत उद्या चाचपणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. नगराध्यक्षपदाबरोबरच नगरसेवकपदाची संधी मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला अजितदादांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!