पुणे : न्यूज कट्टा
परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपी पतीने केला. मात्र वारजे पोलिसांनी तपास करत पतीचं धक्कादायक कांड उघड केलं आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंजली समीर जाधव (वय ३८, रा. शिवणे) असं या खून झालेल्या विवाहितेचं नाव आहे. ती एका खासगी शाळेत शिक्षिका होती. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर पंजाबराव जाधव (वय ४२) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंजली आणि समीर या दोघांना तिसरी आणि पाचवीत शिकणारी दोन मुले असून हे कुटुंब शिवणे येथे वास्तव्यास होते.दिवाळीच्या सुट्टीमुळे जाधव दांपत्यांची मुले गावी गेली होती. त्यामुळं समीर आणि अंजली हे दोघेच घरी होते.
दि. २६ ऑक्टोबर रोजी फिरायला जायचं असल्याचं सांगून समीरने पत्नी अंजलीला सोबत नेले. तिथून ते खेड शिवापुर येथील मरीआई घाटात गेले. तिथून परतून त्यांनी ब्राऊनस्टोन हॉटेलजवळ भेळ खरेदी केली. त्यानंतर समीरने अंजलीला महिन्यापूर्वी भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये नेले. त्या ठिकाणी दोघेही बसून गप्पा मारत असताना त्याने अचानक दोन्ही हातांनी गळा दाबून अंजलीचा खून केला.
त्यानंतर त्याने गोडावूनमध्ये आधीच नेऊन ठेवलेल्या लोखंडी पेटीत अंजलीचा मृतदेह ठेवून त्यावर पेट्रोल ओतत जाळून टाकला. जाळलेली राख नदीपात्रात टाकून दिली. त्यानंतर त्याने दि. २८ ऑक्टोबर रोजी वारजे पोलिस ठाण्यात आपली पत्नी गोगलवाडी फाटा येथील श्रीराम मिसळ हाऊसजवळून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी संबंधित ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अंजली दिसून आली नाही. त्यातच समीर हा वारंवार पोलिसांकडे अंजलीचा शोध लागला का अशी विचारणा करत होता.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर समीरच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानेच पत्नी अंजलीचा खून केल्याची कबुली दिली. अजय देवगणची भूमिका असलेला दृश्यम चित्रपट पाहून त्यानं हा खून केल्याचं पोलिस तपासात सांगितलं. पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून महिन्यापूर्वीच त्याने पत्नीचा खून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने एक गोडावूनही भाड्याने घेतले होते. तसेच आवश्यक साहित्यही त्या गोडावूनमध्ये आणून ठेवले होते, अशी कबुली त्याने दिली आहे.
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने कट रचून समीर जाधवने आपल्या पत्नीचा काटा काढल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. या प्रकरणी पोलिसांनी समीर जाधव याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी राजगड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.





