INDAPUR BREAKING : प्रदीप गारटकरांच्या विरोधाला राष्ट्रवादीकडून ‘ठेंगा’; भरत शहा यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत दाखल केला नगराध्यक्षपदासाठी अर्ज

इंदापूर : न्यूज कट्टा   

आपलं ऐकलं नाही, तर आपणही पक्षाला डावलू अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे. गारटकर यांच्या विरोधाला ठेंगा दाखवत राष्ट्रवादीने इंदापूरच्या नगराध्यक्षपदासाठी भरत शहा यांच्या नावावार शिक्कामोर्तब केलं आहे. आज भरत शहा यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार हेही भरत शहा यांच्यासाठी इंदापुरात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यावरून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्षाला अल्टीमेटम दिला होता. पक्षाकडून आमचा सन्मान राखला जाणार नसेल, आम्ही वेगळी भूमिका घ्यायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे, पक्ष आम्हाला कोलणार असेल, तर आम्ही पक्षाला कोलू हे त्यांनी केलेलं वक्तव्य विशेष चर्चेत आलं होतं. अशातच आज भरत शहा यांनी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं गारटकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यासह इंदापूरच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,माजी नगरसेवक गजानन गवळी, स्वप्नील राऊत, बापूराव जामदार, संजय दोशी, शहा कुटुंबातील प्रमुख मुकुंद शहा, अंगद शहा, वैशाली शहा उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाचा तिडा सोडवण्यासाठी अजितदादांनी पुण्यात बैठक घेतली होती. मात्र गारटकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत पक्षालाच कोले करण्याची भाषा केली होती. अशात आज भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे गारटकर यांच्या भूमिकेला पक्षाने ठेंगा दाखवल्याची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, शहा यांनी आज अर्ज दाखल केला असला तरी येत्या दोन दिवसात अजितदादांच्या उपस्थितीत पुन्हा अर्ज दाखल केला जाईल, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळं गारटकर यांच्या ठाम विरोधाला डावलत पक्षाने त्यांची नोंदही घेणं टाळल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं आहे.

पाटील, माने, गारटकर एकत्र येणार..?

प्रदीप गारटकर यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्या संबंधीच्या पोस्टही सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. त्यामुळं आता पक्षानेच गारटकरांचा चेंडू केल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!