बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडलेली असतानाच त्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत ज्या प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्या ठिकाणीही नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रभागातील विजयी उमेदवारांसह अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांची विशिष्ट यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे. बारामती नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी दुजाभाव करत असून त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्यात यावेत. तसेच आचारसंहिता प्रमुख असलेले पद्मनाभ कुल्लरवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. मुख्याधिकाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या चौकशीत तसे नमूद आहे. त्यामुळं त्यांच्याकडून हा पदभार काढून घ्यावा, अशीही मागणी मोहसीन पठाण यांनी केली आहे.
दुसरीकडे निवडणुकीची तारीख पुढे ढकलताना संबंधित प्रभागातील अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेकांना इच्छा असताना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळं अर्ज दाखल करण्यासाठीही मुभा द्यावी किंवा नव्या कार्यक्रमात कुणाचेही अर्ज मागे घेण्याची मुभा नसावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ज्या प्रभागात निवडणूक बिनविरोध करण्यात आली, त्या ठिकाणी माघार घेणाऱ्या आणि निवडून आलेल्या उमेदवारांची एसीबी, ईडी, एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी किंवा या प्रभागात नव्याने निवडणूक घ्यावी असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
बारामती नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर असताना नवीन तारीख जाहीर झाली. त्यामुळं या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला असतानाच आता मोहसीन पठाण यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलं आहे.




