BARAMATI CRIME : हॉटेलबाहेर पार्किंग करण्यावरून वाद, काठ्या-दगडांनी केला हल्ला; बारामती तालुका पोलिसांनी केली एकाला अटक

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील वृंदावन हॉटेलबाहेर पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून काठ्या व दगडांनी हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत एकाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर अन्य आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

राम अनिल लोखंडे (वय २४, रा. खंडोबानगर) असं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी मानस पाटील (रा. तानाई नगर, बारामती) हे उदय, कुश, साहिल, मनिष, चैतन्य, ओंकार आणि स्वयम या मित्रांसह जेवण्यासाठी गेले होते. यावेळी पार्किंगवरून अनोळखी मुलांशी वाद झाला. त्यानंतर आरोपीदेखील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बसले; मात्र दरम्यान त्यांनी फोन करून ८-१० जणांना बाहेरून बोलावले.

फिर्यादी पाटील जेवण करून बाहेर येताच आरोपींनी अचानक काठ्या, लोखंडी गज आणि दगडांद्वारे हल्ला चढवला. दगड फेकून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. मानस पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांना मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पावले उचलली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. फिर्यादीचा जबाब, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून राम अनिल लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. उर्वरीत फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, दिपाली गायकवाड, पोलिस जवान जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांनी केली असून उपनिरीक्षक युवराज पाटील हे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, बारामती एमआयडीसीत कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हॉटेलचालक-मालक, व्यावसायिक, नागरिक यांनी अशा गोष्टींची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असं आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!